संस्थान - श्री दत्त मंदिर, श्री क्षेत्र देवगड

देवता प्रतिमा

श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा

श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा
संत परंपरेला समृध्द करणारे अलीकडच्या काळातील महान संत समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा. देवगडजवळच्या गोधेगावात 1907 साली सत्शील मातापित्याच्या पोटी जन्म घेऊन त्यांनी समाजकल्याणाचा ध्यास घेतला. प्रवरेच्या पात्रात सतत 12 वर्षे श्रीशंकराची आराधना करणाऱ्या बाबांनी साधनेतील सातत्याचा मंत्र दिला. देवगडला श्रीदत्तप्रभूंच्या मंदिराची उभारणी करून संस्थानाची मुहुर्तमेढ रोवली. अखंड नामस्मरण, सर्वकल्याणाचा ध्यास आणि लोकहिताचा उपदेश हेच त्यांचे जीवन होते. समाधी मंदिर हे त्यांच्या कृपेचे प्रतीक असून आजही भाविकांना अध्यात्मिक शांततेचा अनुभव देते.

अधिक वाचा →

परमपूज्य गुरुवर्य ह.भ.प. श्री. भास्करगिरी महाराज

भास्करगिरी महाराज
समर्थ सद्‌गुरू किसनगिरी बाबांनी ज्यांच्या हाती विश्वासाने देवगड 1975 साली सोपविले ते परमपूज्य भास्करगिरी महाराज म्हणजे गुरुनिष्ठेचा आदर्श. जे आहे ते सद्‌गुरूंचे, जे करायचे तेही सर्व सद्‌गुरूंसाठी, त्यांच्या आनंदासाठी अशा पद्धतीने सद्‌गुरूंशी एकरूप होणे कृपेशिवाय साध्य होत नाही. ही महकृपा लाभलेले सद्‌गुरू भास्करगिरी महाराज देवगड परिसराचा लौकिक शतपटीने वाढवीत आहेत. लक्षावधींचे श्रद्धास्थान असणारे हे तीर्थक्षेत्र येणाऱ्या प्रत्येकाला शाश्वत सुख देईलच इतके समृद्ध करण्याचे मोठे काम सद्‌गुरूकृपेने परमपूज्य भास्करगिरी महाराज करीत आहेत. आध्यात्मिक तीर्थक्षेत्रांची लोकविकासातील भूमिका प्रभावीपणे मांडणारे आणि त्या संदर्भात कृतिशील असणारे परमपूज्य भास्करगिरी महाराज लक्षावधींचे श्रद्धास्थान आहेत. परंपरांशी एकनिष्ठ राहूनही आधुनिकतेचा विचार मानणारे, ईश्वरसेवेला समाजसेवेपर्यंत विस्तारत नेणारे आणि 'ईश्वरः सर्वभूतानाम' या शास्त्र वचनानुसार आचरण करून मानवसेवेला नवे परिमाण देणारे परमपूज्य भास्करगिरी महाराज समान्यांचे खरे हितैषी आहेत.

परमपूज्य गुरुवर्य ह.भ.प. प्रकाशानंदगिरी महाराज

प्रकाशानंदगिरी महाराज
परमपूज्य प्रकाशानंदगिरी महाराज हे देवगड संस्थानाचे सद्य अध्यात्मिक मार्गदर्शक असून त्यांनी किसनगिरी व भास्करगिरी महाराजांच्या परंपरेला नवे तेज दिले आहे. सन 2022 साली परमपूज्य गुरुवर्य ह.भ.प. श्री. भास्करगिरी महाराज यांनी त्यांची श्री क्षेत्र देवगडचे उत्तराधिकारी म्हणून निवड केली. समाजसेवा, भक्तीपर उपक्रम आणि दत्तगुरूंचा संदेश जनमानसात पोहोचवण्याचे महान कार्य ते करीत आहेत.