श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा - श्री क्षेत्र देवगड

दि. १३ सप्टेंबर १९०७ रोजी प्रवरा नदीच्या काठावरील गोधेगाव या गावात रामभक्त शबरी समाजातील एका कुटुंबात राहीबाई यांच्या पोटी एका तेजस्वी बालकाने जन्म घेतला. पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे हरिचे दास जन्म घेती ।। तु. म. ।। अशीच जणू ही घटना होती. मात्र, अजून ते समाजाला अनुभवाला यायचे होते. आई राहीबाई आणि वडील मारुती यांनी या सावळ्या बाळाचे नाव किसन असे ठेवले. मुलाचा स्वभाव बालपणापासून लाजरा-बुजरा पण धार्मिक वृत्तीचा बनत चालला होता. किसन चालू लागला आणि बागडू-खेळू लागला त्या वयातच गावातील पाटलांची गुरे, शेळ्या राखण्याचे काम करू लागला. किसन जसजसा मोठा होऊ लागला तसतसा या मुलाच्या वागण्या-बोलण्यातील तन्हेवाईकपणाचा अनुभव लोकांना येऊ लागला. अवलिया आपल्याच मस्तीत थेट शाश्वत सत्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्या काळातील त्याचे वागणे ऐहिक जीवनातील लोकांना चमत्कारिक वाटू लागते. किसन जन्मदात्या आईशिवाय दुसऱ्या कोणाच्याच हातचे अन्न खात नसे. पुढे-पुढे तर स्वतः हाताने तयार केलेलेच अन्न खाण्याचा नेम सुरू झाला. मोठ्या भावासोबत त्याला मासे पकडण्यासाठी पाठविले तर भावाने पकडलेले मासे हा पुन्हा पाण्यात ताबडतोब सोडून द्यायचा. अशा प्रकारचे तन्हेवाईक वागणे पुढे वाढतच चालले. अठराव्या वर्षापासून किसनवाबांना शंकरभक्तीचा ध्यास लागला. दिवसभर शेतात कष्ट करायचे आणि रात्री तासन्तास प्रवरा नदीच्या काठी वाळूची महादेवाची पिंड करून तिची सेवा करीत राहायचे ही सेवाही अलौकिकच होती वाळूची पिंड तयार करायची. समोर दोन काड्या उदबत्तीसारख्या खोचायच्या. नदीत अंघोळ करायची आणि पुन्हा पिंडीला पाणी घालायचे. पाणी घालताच पिंड विरघळून जायची. मग पुन्हा पिंड तयार करायची आणि पुन्हा पाणी घालायचे ज्यावेळी पाणी घालूनही पिंड विरघळायची नाही त्यावेळी ही पूजा थांबायची. मात्र, चमत्कार असा व्हायचा की कधी-कधी उदबत्त्या समजून खोचण्यात आलेल्या काड्या आपोआप पेट घ्यायच्या आणि सगळीकडे सुगंध पसरायचा. हा प्रकार पाहणारे लोक म्हणायचे की, 'हा पोरगा मांत्रिक झाला' कुणी म्हणायचे की, 'बहुधा याला वेड लागलेय. मात्र, लोकांच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत किसनची शिवपिंडीची पूजा अविरत १२ वर्षे चालली होती. गावात एक मोठे उंबराचे झाड अचानक वाळून गेले होते. किसनने त्याला एका लहान भोपळ्याने रोज नदीचे पाणी आणून घालण्यास सुरुवात केली आणि ते झाड पुन्हा फुलले, बहरले. ज्या पाटलांकडे तो काम करीत असे त्या पाटलांनी सहज गमत करीत किसनला एक महिनाभर लिंबाच्या पाला खाऊन राहण्याची पैज लावली. किसनने ती सहज स्वीकारली आणि रोज लिंबाचा पाला खाऊन त्याने महिना काढला, लिंबाचा पाला खाल्ल्यामुळे किसनची प्रकृती खालावण्याऐवजी उलटे झाले. साक्षात मारुतीरायासारखे तेज त्याच्या अंगी निर्माण झाल्याचे सर्वांना दिसू लागले. आता किसनला कामावर ठेवण्याचेही लोकांना धाडस होईना. लोकांनी त्यांना कामावर ठेवणेच बंद करून टाकले काम मिळेनासे झाल्यावर किसनने चारीधाम यात्रा करण्याचा निश्चय केला. तो वडिलांना बोलून दाखविला. मात्र, त्यांच्या निर्णयाची वाट न पाहता किसन यात्रेला निघाला. वडिलांनी स्वत जवळचे अवघे चार रुपये जबरदस्तीने मुलाजवळ दिले. ते चार रुपये घेऊन किसनने गाव सोडले. बरोबर १५ दिवसानी किसन गावात आला. चारीधाम झाले असे लोकांना सांगू लागला. लोकानी त्याला वेड्यात काढले. गावातील काही जाणकार मंडळी जमली. त्यानी प्रत्येक धामाच्या काही खाणाखुणा किसनला विचारल्या. त्याने त्या बरोबर सांगितल्या. शिवाय सर्वांसमक्ष वडिलांनी दिलेले चार रुपयेही त्यांना परत करून टाकले. सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या कल्पनेने लोक चकित झाले. तेथून पुढे त्यांना गावातील मंडळी किसन न म्हणता किसनबाबा म्हणून लागली. ३० मिनिटांत ४८ मैल प्रवास ! जगदोद्धारालागी धरीला अवतार मिरविला बडीवार सिद्धाईचा ।। (निळोबाराय) श्री बाबांनी १५ दिवसांत पायी चारीधाम केले हे अनेकांना पटत नव्हते. मात्र, एकदा याची प्रचीती लोकांना सहज आली. गावच्या पाटलांनी बाबाना 'अरे किसन इकडे ये' अशी हाक मारली. पाटलानी खिशातून एक चिठ्ठी काढून बाबांच्या हातात ठेवली व म्हणाले की, 'हे बघ आत्ताच्या आत्ता निघ आणि ही चिठ्ठी झोडेगावच्या पाहुण्यांना पोहोचवून ये' बाबांनी ती चिठ्ठी घेतली आणि बाहेर पडले. अर्ध्या तासाने पाटील सहज घराबाहेर पडले तर त्यांना समोर बाबा दिसले. त्यांनी बाबांना जरा रागानेच विचारले, 'अरे तू अजून इथेच. तू गेलाच नाही की काय झोडगावला?' यावर बाबांनी शांतपणे एक चिठ्ठी काढून पाटलांच्या हातात ठेवली. ती पाहताच पाटलांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. कारण ती चिठ्ठी पाटलांना झोडगावच्या पाहुण्यांनी उत्तरादाखल दिलेली होती. हा पोरगा कोणी सामान्य नाही हे पाटलांनी जाणले. कारण गोधेगाव ते झोडगाव हे अंतर २४ मैलांचे आहे. कोठेही दत्त म्हणून उभे राहणारा हा पोरगा साक्षात दत्तगुरूचा अवतार आहे असा दृष्टांतच पाटलांना झाला. त्रिस्थळी सहज संचार करणारा आणि माधुकरीवर गुजराण करणारा हा थोर पुरुष साक्षात श्री दत्तगुरूंचा अवतार तर नाही ना, असे त्यांना वारंवार वाटू लागले. करील ते काय नव्हे महाराज। परि पाहे बीज शुद्ध अंगी ।। तु.म. ।। असाच एक प्रसंग बाबा तरुण असताना त्यांच्या मित्रांच्या बाबतीत घडला. बाबांची आणि मित्रांची अंकाईला जाण्याची पैज लागली. सर्वांनी गोदामायीची कावड घेऊन गंगापूरपर्यंत सोबत जायचे. तेथून मित्रमंडळी मोटारीने जाणार आणि बाबानी पायी जायचे असे ठरले. ठरल्याप्रमाणे गंगापूरहून मित्रमंडळी कावडीसह एस.टी.त बसली. एस.टी. निघाली आणि बाबा पायी निघाले. मोटार अंकाईच्या पायथ्याशी पोहोचली. हुश्श करीत मंडळी बसमधून खाली उतरली, तर समोर हसत-हसत हात जोडून सर्वांना रामराम घालत बाबा येताना दिसले. सर्व मंडळी आश्चयनि चकित झाली. सर्वांनी बाबांची क्षमा मागितली. सर्वजण बाबाना शरण आले. देवगड स्थापना आता किसनबाबा २० वर्षांचे झाले होते. बारा वर्षे म्हणजे एक तप शिवपिडीची सेवा पूर्ण झाली होती. चारधाम यात्रा झाली होती. आता त्यांनी गावोगावी फिरून माधुकरी मागायला सुरुवात केली. माधुकरीमध्ये चारा, पीठ, भाकरी यायचा. त्यातील चारा ते जनावरांना टाकत. भाकरी कुत्रे, मासे, पक्षी यांना खाऊ घालत. पुढे-पुढे माधुकरी खूप यायला लागली. मग त्यांनी सप्ताह, भंडारा असे कार्यक्रम सुरू केले. श्री बाबा ज्या गावात माधुकरी मागायला जात तेथे काहीतरी शुभ घडत असे. श्री बाबाच्या आशीर्वादाने लोकांचे आजारही बरे होऊ लागले. बाबांच्या रूपाने लोकांना दुःखहर्ता मिळाला होता. लोक बाबांना सढळ हाताने माधुकरी देऊ लागले. बाबा प्रवरातीरावर असलेल्या एका औदुंबराच्या झाडाखाली श्रीदत्तप्रभूची सेवा करीत असत. पुढे ही जागा श्री बाबांना फार आवडली असल्याने तेथेच दत्तप्रभूचे मंदिर बांधण्याचा मानस त्यांनी आपल्या भक्तजनांपुढे बोलून दाखविला. या काळात श्री बाबांनी नेवासा बु।। येथे संतपुरुष श्री नाथबाबा यांचे शिष्यत्व पत्करले होते. गुरूंच्या आशीर्वादाने आणि भक्तांच्या सहकायनि श्री बाबांनी शून्यातून सुष्टी उभारली. त्या औद्वराच्या जागेवर आता श्रीक्षेत्र देवगड देवस्थान उभे आहे. त्याकाळी तेथे खड्डे असलेली जागा होती. तत्कालीन तहसीलदार अवचट यांनी लिलाव करून ती जागा बाबांना विकत दिली. ताबडतोब सपाटीकरणाचे काम सुरू झाले. १९५७ च्या सुमारास प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. या काळात गोदावरीच्या काठावर सर्वत्र बाबांची ख्याती पसरू लागली. लोक मुक्तहस्ताने बाबांना माधुकरी देऊ लागले. श्री बाबा फक्त गुरुवारी आणि शनिवारी गडावर थांबत असत. सर्व कामगार आपापल्या मनाने सर्व कामे करीत. श्री बाबांनी पैशाचा हिशोब कधीच ठेवला नाही. त्यांना लिहिता-वाचता येत नव्हते. म्हणून नव्हे; पण इतरांसाठीही किंवा इतरांकरवीही त्यांनी कधी हिशोब ठेवला नाही. कामगारांना कामाचे दिवस विचारायचे आणि त्याप्रमाणे त्यांना पैसे द्यायचे. सर्व विश्वासाचा व्यवहार होता. भक्तीचा मेळावा तिथे जणू निर्माणाची चळवळ चालवीत होता. श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे सर्व बांधकाम हे श्री बाबांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. श्री बाबांच्या कल्पनाविश्वातून साकार झालेला तो भूलोकीचा स्वर्ग आहे. साधकांना तेथे अपूर्व समाधान आणि स्वर्गीय आनंद मिळाला पाहिजे अशा कल्पनेतून श्री बाबांनी ही रचना केली आहे. एकेकाळी निर्जन, ओसाड, असलेल्या जागेवर आता अखंड धर्मजागरणाची चळवळ चालू आहे. हे तीर्थस्थान झाले आहे. सतत साधकांचा, भक्तांचा तेथे ओघ चालू असतो. मृत व्यक्ती जिवंत अशक्य ते तुम्हा नाही नारायणा । निर्जिवा चेतना आणावया ।। (तु.म.) मृत व्यक्ती जिवंत करणे आणि तेही दैवी सामर्थ्याने. हे ऐकून कुणालाही या विज्ञानयुगात आश्चर्य वाटेल कदाचित विश्वासही बसणार नाही; परंतु हे चक्षुर्वैसत्यम् आहे. सुरेगाव, ता. नेवासा येथील शेतकरी बाबांचे भक्त श्री. कुंडलिक पा. शिंदे व त्यांचा मुलगा ज्ञानदेव हे दोघेही प्रत्येक शुद्ध एकादशीस येथे (गडावर) येत, रात्री भजन करीत व द्वादशीस महाप्रसाद घेऊन जात. असेच एका एकादशीला ते देवगडला निघाले, बरोबर गावातील २५-३० मंडळी होती. पायी चालत सर्वजण गोधेगावपर्यंत आले, गोधेगावचे बाबांचे भक्त व ज्ञानदेवचे स्नेही श्री. आरगडे टेलर भेटले. त्यांनी ज्ञानदेवला आपल्या घरी नेले. इतर सर्व मंडळी देवगडला आली. तिकडे दोघेही टेलरच्या घरी फराळासाठी पाटावर बसले. दोन घास घेतले तो अचानक ज्ञानदेवला रक्ताच्या वांत्या सुरू झाल्या, त्याला सावरून घरेपर्यंत त्याची शुद्ध हरपली. थोड्याच वेळात त्याचा श्वासोच्छ्वास बंद झाला. जाणकारांच्या मते कुणीतरी ज्ञानदेवला मूठ मारली. शेजारी-पाजारी जमले, घरातील बाईमाणसे रडू लागली. हे सर्व घडत असताना गावातील एक माणूस देवगडला आला व बाबांना घडलेला प्रकार सांगितला. बाबांनी ताबडतोब त्या माणसाजवळ उदी व चौकी दिली. तो ती घेऊन गोधेगावी आला. ज्ञानदेवाच्या गळ्यात चौकी बांधली. अंगावर उदी टाकली व काही तोंडात टाकली आणि काय आश्चर्य ज्ञानदेव झोपेतून जागा झाल्याप्रमाणे उठून बसला जणू काहीच घडलेच नाही, नंतर तो गोधेगावच्या मंडळीबरोबर गडावर आला. रात्री भजन-कीर्तन झाले, सकाळी पुन्हा उदी घेऊन तो घरी गेला. अद्याप पुन्हा त्याला अशा प्रकारचा त्रास झाला नाही. श्री बाबांचे जसजसे अनुभव लोकांना येऊ लागले तसतसे लोक त्यांना प्रत्यक्ष दत्तप्रभूचा अवतार मानू लागले. भक्ताहुनि देवा आवडते काही । त्रिभुवनि नाही आण दुजे ।। देवाला सर्वांत प्रिय काय असेल तर 'भक्त' मग त्या ठिकाणी जातकुळीचा विचार नाही. उंचनीच काही नेणे भगवंत । तिष्ठे भाव भक्ती देखोनिया ।। भक्तांसाठी देव काहीही करायला सदैव तयार असतो, जनाबाईला दळू लागतो, गोरा कुंभारास मडकी घडवू लागतो, मीराबाईंसाठी विष प्राशन करतो, तर शबरीची उष्टी बोरे खातो. हरि तैसे हरिचे दास याच गोष्टीचा प्रत्यय देवगडला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला येतो, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरते । उद्धराया आले दीनजना ।। श्री किसनगिरी बाबा म्हणजे दत्तगुरूंचा साक्षात अवतार — भक्तांसाठी प्रेम, श्रद्धा आणि कृपेचे मूर्त रूप.

॥ प.पू. श्री किसनगिरी बाबांची आरती ॥

आरती सद्‌गुरुराया। ओवाळीन प्रेमे काया। किसनगिरी नाम तुझे। असे त्रिमूर्तीची छाया ॥ धृ ॥ वृत्ती तुझी दुर्वासापरी। बहु कठीण निर्धारी। तपश्चर्या केली जीवनी। दुस्तर पावकांपरी ॥ १॥ औदुंबर तरूखाली। अवधूत साक्षात्कार झाला। करूनिया शक्तिपात। गौरविली तुझी काया ॥ २॥ दीन, दुःखी व्याधिग्रस्त। पीडियले त्रिविध तापा। करूनिया सकळ शांती। तोषविले इहलोका ॥ ३॥ निष्कलंक जीवन तुझे। धन्य श्री गुरुराया। श्री गुरुदास ठेवी माथा। तव चरणावरता ॥ ४॥ आरती सद्‌गुरुराया। ओवाळीन प्रेमे काया। किसनगिरी नाम तुझे। असे त्रिमूर्तीची छाया ॥ धृ ॥

← परत जा