श्री दत्त मंदिर, श्री क्षेत्र देवगड

🙏 श्री दत्त मंदिर, श्री क्षेत्र देवगड 🙏

“श्रद्धा, भक्ती आणि सेवा यांचा दिव्य संगम”

मंदिराची माहिती

भूनंदनवन श्रीक्षेत्र देवगड परिसरातील प्रमुख मंदिर म्हणजे श्री दत्तप्रभूचे मंदिर. आकर्षक नक्षीकाम, दगडी बांधकाम, संगमरवराचा कल्पक आणि योग्य वापर, चार फूट उंचीचा भव्य सुवर्ण कळस आणि सात्त्विकतेची प्रचीती देणारी रंगसंगती ही या मंदिराची वैशिष्ट्ये.

या सर्व वैशिष्ट्यांना पावित्र्य देणारी श्री दत्तप्रभूची लोभस मूर्ती या मंदिराचे खरे वैभव आहे. मंदिरात प्रवेश करताच दृष्टीस पडणारी स्वच्छता, पावित्र्य जपण्याचा केलेला आटोकाट प्रयत्न आणि संतजनांच्या सहवासाने मंदिर सभागृहाला लाभलेली आध्यात्मिक श्रीमंती या मंदिराच्या आकर्षणाचा महत्त्वाचा भाग आहे.

हरिनामाच्या गजराने पावन झालेला मंदिराचा प्रत्येक कोपरा जणू या गजरात आपला आवाज मिसळून परमात्म्याला आळवतो आहे असे वाटते. या मंदिरात दर्शनाचे समाधान, चित्ताला शांती आणि वृत्तीला सात्त्विकतेचे कोंदण लाभते.

मंदिरात जायचे कशासाठी? या प्रश्नाचे यथार्थ उत्तर घेऊनच भाविक मंदिरास प्रदक्षिणा घालतो आणि श्री दत्तप्रभूना डोळ्यांत साठविण्याचा प्रयत्न करतो. हेच या मंदिराचे ऐश्वर्य आहे.